दुधवा अभयारण्यात सफर आणि व्याघ्रदर्शन
माझ्या पुणे ते आयोध्या (नोव्हेंबर 2024) सायकलवारीनंतर मला उत्तर भारतात असलेल्या लखनौ जवळील दुधवा नॅशनल पार्क ह्या वन्यजीव अभयारण्यात सफारी करण्याचा योग जुळून आला. तेथे आम्हाला वाघ आणि इतर वन्यजीव हिवाळ्याच्या सुंदर सॉफ्ट लाईट मध्ये फोटोग्राफी करायची छान संधी होती. दुधवा चे जंगल हे हिमालयाच्या पायथ्याशी असल्यामुळे फार उंच आणि भव्य झाडांनी नटलेले आहे. ह्या जंगलाला तुराईचे जंगल असेही म्हणतात. या जंगलात मुख्यत्वे करून वाघ आणि हत्ती यांचे वास्तव्य आहे. हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये तापमान फार कमी म्हणजे 5 ते 19 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जाते. पहाटेच्या वेळी खूप जास्त थंडी असल्यामुळे सफारी करताना हालत खराब होते. आम्ही तीन दिवसात एकूण पाच सफारी करण्याचे ठरविले होते. त्यातील चार सफारी किशनपुर रेंज तर एक सफारी दुधवा रेंजमध्ये करायचे ठरवले होते. पहिल्या चारही सफारीमध्ये आम्ही जंगलात जिप्सी मध्ये वणवण हिंडलो पण आम्हाला वाघांनी दर्शन दिले नाही. वाघ असल्याच्या खुणा ह्या जागोजागी दिसत होत्या , जसे की पावलांचे ठसे जागोजागी दिसत होते , काही प्राण्यांचे आवाज , ज्यांना अलार्म कॉल...