दुधवा अभयारण्यात सफर आणि व्याघ्रदर्शन
माझ्या पुणे ते आयोध्या (नोव्हेंबर 2024) सायकलवारीनंतर मला उत्तर
भारतात असलेल्या लखनौ जवळील दुधवा नॅशनल पार्क ह्या वन्यजीव अभयारण्यात सफारी
करण्याचा योग जुळून आला. तेथे आम्हाला वाघ आणि इतर वन्यजीव हिवाळ्याच्या सुंदर
सॉफ्ट लाईट मध्ये फोटोग्राफी करायची छान संधी होती.
दुधवा चे जंगल हे हिमालयाच्या पायथ्याशी असल्यामुळे फार उंच आणि भव्य
झाडांनी नटलेले आहे. ह्या जंगलाला तुराईचे जंगल असेही म्हणतात. या जंगलात
मुख्यत्वे करून वाघ आणि हत्ती यांचे वास्तव्य आहे. हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये
तापमान फार कमी म्हणजे 5 ते 19 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जाते. पहाटेच्या वेळी खूप
जास्त थंडी असल्यामुळे सफारी करताना हालत खराब होते.
आम्ही तीन दिवसात एकूण पाच सफारी करण्याचे ठरविले होते. त्यातील चार
सफारी किशनपुर रेंज तर एक सफारी दुधवा रेंजमध्ये करायचे ठरवले होते. पहिल्या चारही
सफारीमध्ये आम्ही जंगलात जिप्सी मध्ये वणवण हिंडलो पण आम्हाला वाघांनी दर्शन दिले
नाही. वाघ असल्याच्या खुणा ह्या जागोजागी दिसत होत्या, जसे की पावलांचे ठसे जागोजागी दिसत
होते, काही
प्राण्यांचे आवाज, ज्यांना
अलार्म कॉल असे म्हणतात, तेही
ऐकू येत होते. परंतु वाघोबांनी आम्हाला काही दर्शन दिले नाही.
आता शेवटची सफारी होती आणि आम्ही थोडेफार निराश होतो. पण त्याचबरोबरच
थोडे उत्सुकही होतो. आज आम्हाला वाघ दिसणार याची फार जास्त शाश्वती गाईड आणि
जिप्सी ड्रायव्हर यांनी सकाळी दिलेली. त्यानुसार आम्ही जंगलात फिरायला लागलो.
आम्हाला वाघाच्या पावलांचे ताजे ताजे ठसे रस्त्यावरून पाणथळ जागे कडे जाताना
दिसले. ड्रायव्हरला अचानक लांब वाघसदृश्य आकृती दिसली आणि त्याने जिप्सी त्या
दिशेने जोरात दामटली. अहो आश्चर्य! आमच्या समोर बेलदांडा ह्या पाणथळ जागी वास्तव्य
असणारी वाघीण ऐटीत जाताना दिसली. पण ती आमच्या पुढे चालत होती त्यामुळे तिचा चेहरा
आम्हाला दिसत नव्हता. थोडा वेळ चालल्यानंतर ती उजव्या बाजूच्या झाडीत सावजाच्या
शोधात वळली. परंतु अनुभवी गाईड आणि ड्रायव्हर यांनी आम्हाला सांगितले की ती आता
पाणी प्यायला त्या पाणथळ जागी नक्की येणार. त्या दृष्टीने आम्ही आमची जिप्सी
मोक्याच्या ठिकाणी पार्क करून तिची वाट बघायला लागलो. फक्त पाचच मिनिटे गेले असणार
आणि ती सुंदर सूर्यप्रकाशातून ऐटीत चालत त्या पाणथळ जागी पाणी प्यायला आली. त्या
सूर्यप्रकाशात तिची फर सोनेरी रंगात चमकत होती. मी विस्मयचकित होऊन तिच्याकडे बघत
होतो आणि माझा कॅमेरा सावरत जमेल तितके फोटो काढत होतो. आता ती पाणी प्यायला बसली
आणि निवांत पाणी प्यायला लागली. मनसोक्त पाणी पिऊन झाल्यावर ती उठली आणि दाट
जंगलात दिसेनाशी झाली.
माझ्या कॅमेरातून टिपलेल्या ह्या बेलदंडा वाघिणीच्या निवडक फोटोंचा
आस्वाद घ्या आणि आपला अभिप्राय कळवा.
वाघीणिचे मागून दर्शन
सोनेरी उन्हात वाघीण
निवांत पाणी पिते जरा.
आता शिकारीला निघायला हवे
बरंय मग, येते
मी.
भेट दिल्याबद्दल धन्यवाद!
अनुप कोहळे





Comments