उजनी धरणातिल प्राचीन श्रीराम आणि शिवमंदीर
बारामती तालुक्यातील उजनी धरणात गेलेले एक गांव आणि त्यातील १००० व्या शतकातील प्राचीन शिवमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले पळसदेव गांव. दर वर्षी उन्हाळ्यात जेंव्हा धरणातील पाणी कमी होते, तेंव्हा हे मंदिर पाण्याच्या बाहेर येते. ते बघायला बरेच पर्यटक आणि हौशी छायाचित्रकार तेथे गर्दी करतात. बऱ्याच दिवसांपासून हे मंदिर बघण्याची आणि त्याचे छायाचित्र घेण्याची इच्छा माझ्या मनात होती. परंतु काही केल्या मुहूर्त सापडत नव्हता. अचानक शुक्रवार २६ जून रोजी आमच्या फोटू कट्टा समूहातील रुपेशजी ह्यांनी आवाहन केले की शनिवारी आपण सगळे पळसदेव येथे जायचे आहे. मला धरून १० लोक तयार झाले. माझे शेजारी मकरंद धुरी ह्यांनी सुद्धा यायला तयारी दर्शवली. माझी छोटी मुलगी, आभा हिने सुद्धा हट्ट धरला. अनायासे सुट्टी असल्याने मी पण तिला घेऊन जायला तयार झालो. मी माझी गाडी घ्यायचे ठरवले. माझ्या सोबत आभा, मकरंद आणि फोटु कट्टा मधील एक सदस्य जयेश दुपारी १ च्या दरम्यान पळसदेव साठी निघालो. बाकीचे लोक रुपेशजींना घेऊन दुसऱ्या गाडीतून येणार होते. २:१५ च्या दरम्यान आम्ही रुपेशजींना भटलो, दुसरी गाडी यायला ट्रॅफिक मुळे उश...